सांगली - वारणा पट्ट्यात अति पावसामुळे सोयाबीनचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे पीकविमा कंपनीने भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. सांगली, शिराळा व वाळवा तालुक्यात सध्या पावसाची रिपरिप मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने वारणा पट्ट्यातील ऐतवडे बुद्रुक, कार्वे, ढगेवाडी, शेखर वाडी परिसरात शेतातील सोयाबीन पीक पूर्णपणे वाया गेले आहे. त्यामुळे अगोदरच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक वाया गेल्याने अधिक आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
कृषी विभागाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भुईमूग, सोयाबीन, भात या पिकाचा विमा उतरवण्यासाठी गावोगावी प्रबोधन केले होते. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, त्यांना लाभ मिळण्यासाठी कृषी विभागाने ताबडतोब पिकांचा पंचनामा करण्यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांना निवेदन देण्यात आले आहे. पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याची मागणी शहाजी गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तर ऐतवडे बुद्रुक येथील 90 टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक वाया गेल्याने शहाजी गायकवाड यांनी सोशल मीडियावर फोटो टाकले. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी शेतातील पिकांची पाहणी केली आहे.