सांगली - चालत्या दुचाकीमध्ये नाग दिसला आणि दुचाकीस्वाराची पाचावर धारण बसली, थेट चालत्या गाडीवरून उडी मारून दुचाकीस्वाराने कसा बसा आपला जीव वाचवला, मात्र, नाग कुठे गेला याचा शोध घेतला असता, तो गाडीतचं दबा धरून बसल्याचे दिसले. यानंतर एकच धावपळ उडाली, नागभूमी शिराळा याठिकाणी हा प्रकार घडला आहे.
दुचाकीत घुसला नाग -
सांगलीच्या शिराळा येथील दिग्विजय शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरून आपल्या शेताकडे निघाले होते. गाडी सुरू करून काही अंतरावर गेले असता त्यांना आपल्या पायाजवळ नाग असल्याचे दिसून आले. शिंदे यांनी जीव वाचवण्यासाठी थेट चालत्या गाडीवरून उडी घेतली. त्यानंतर त्यांनी गाडीच्या आजूबाजूला बघितले असता त्यांना नाग कुठेच आढळला नाही. मग शिंदेंनी त्यांचे बंधू आणि मित्रांना बोलवून घेतले. यावेळी सर्वांना घडलेली हकीकत सांगितली. सर्वांनी आसपास शेतात नागाचा शोध घेतला मात्र नाग कुठेचं सापडला नाही.
दुचाकीतुन निघाला नाग -
यावेळी नाग चुकून गाडीत गेला काय ? ही शंका मनात आली आणि गाडी तपासून बघितले असता नाग सीटच्या खाली असलेल्या पॅनल मध्ये बसला असल्याचे आढळून आले. मग गाडीत लपून बसलेल्या नागाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मात्र, तब्बल 2 तासाच्या अथक प्रयत्ना नंतर गाडीत लपून बसलेल्या 4 ते 5 फूट नागाला बाहेर काढण्यात यश आले. सुखरूप बाहेर काढलेल्या नागाला निसर्गाच्या अधिवासात सोडल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.