सांगली - जिल्ह्यात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. मुस्लिम समाजाकडून शिवजयंती साजरी करत महिला सफाई कर्मचाऱ्यांना शाल वाटप करण्यात आले. तसेच यावेळी पुलवामामध्ये वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धाजंली वाहण्यात आली.
शहरातील शामराव नगर येथील मुस्लिम समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्याबरोबर सांगली महापालिका क्षेत्रातील सफाई कर्मचार्यांना शाल वाटप करण्यात आले. पहाटे कडाक्याच्या थंडीत शहराची स्वच्छता करणाऱ्या सुमारे पंधराहुन अधिक महिला कर्मचाऱ्यांना यावेळी शाल वितरित करण्यात आल्या. तर शहरातील अनेक मंडळांकडून भव्य अशा मिरवणूका काढण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा आणि हातात भगवे झेंडे घेऊन मोटरसायकल रॅली यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.
सांगली महापालिकेच्यावतीनेही शिवजयंती साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पालिकेच्यावतीने पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सांगली पोलीस दलाकडूनही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक प्रमुख सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपाधीक्षक अशोक वीरकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.