सांगली - राज्यात भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाले आहे. युतीमध्ये भाजप आणि सेना यांच्यात सत्ता स्थापने वरून जुंपली आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव आधीच जाहीर झाले आहे. अशात शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावेत यासाठी सांगलीतील एका कट्टर शिवसैनिकाने थेट गणपतीला साकडे घातले आहे, तेही चक्क 2 किलोमीटर दंडवत घालून.
सांगलीतील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे हरिदास पडळकर यांनी गणरायाच्या चरणी हे साकडे घातले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सांगली नगरीचे आराध्य दैवत असणाऱ्या गणपती पेठेतील गणेश मंदिरापर्यंत दंडवत घालत गणेश चरणी पडळकर यांनी ही मागणी केली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी तमाम शिवसैनिकची इच्छा असल्याचे मत यावेळी पडळकर यांनी व्यक्त केली आहे.