सांगली - मागील पाच दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगाव या तालुक्यांसह जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू आहे. पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आले असून नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले आहे. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने सांगली शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीमुळे सांगली आणि मिरज शहरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक लोकांचे संसार पाण्याखाली बुडाले आहेत. सांगली उपनगरातील सर्व प्रमुख मार्ग पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. शहरातील भिमनगर, शामरावनगर, टिम्बर एरिया, गोकुळनगर, शारदा कॉलनी, वारणाली, कोल्हापूर रोड व नदीकाठच्या भागामध्ये पाणी शिरल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.
दरम्यान, सांगलीत सुरू असणाऱ्या पावसामुळे पद्माळकडून सांगलीत आलेल्या नाल्याला पूर आला. त्यामुळे कर्नाळ रोड-जगदंबा कॉलनीतील पाच घरांना पाण्याचा वेढा बसला. या ठिकाणच्या 22 जणांना बाहेर काढण्यात महानगरपालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला यश आले आहे. यामध्ये 2 महिने आणि 6 महिन्याच्या बाळांसह बाळंतिणीचीसुद्धा अग्निशामक विभागाने सुटका केली आहे.