सांगली - पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबरला रोजी मतदान होणार आहे. भाजपाकडून पुणे पदवीधर मतदार संघातून सांगलीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संग्रामसिंह हे माजी आमदार संपतराव देशमुख यांचा मुलगा आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे चुलत भाऊ आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे ते पारंपरिक राजकीय शत्रू मानले जातात.
संग्रामसिंह देशमुखांची कारकीर्द -
संग्रामसिंह यांचे बी. ए.पर्यंत शिक्षण झालेले आहे. ते कडेपूर येथून जिल्हा परिषद गट सदस्य म्हणून निवडून आले होते. निवडून आल्यानंतर सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची वर्णी लागली होती. अडीच वर्षे देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. सहकार क्षेत्रातही देशमुख यांचे ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड, गोपूज आणि संपतराव देशमुख मिल्क युनियन लिमिटेड, रायगाव या उद्योगांच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. सध्या ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष पदी कार्यरत आहेत.
संग्रामसिंह यांची राजकीय कारकीर्द -
कडेगाव-पलूस मतदार संघात दिवंगत माजी मंत्री पतंगराव कदम आणि दिवंगत माजी आमदार संपतराव देशमुख घराण्यात राजकीय वैर राहिले आहे. ते आजही कायम आहे. 2018 मध्ये पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा पोट निवडणुकीत संग्रामसिंह यांनी भाजपाकडून अर्ज भरला होता. मात्र, पक्षाच्या आदेशानंतर देशमुख यांनी माघार घेतली होती. त्यामुळे विश्वजित कदम हे बिनविरोध निवडून आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीमध्ये पलूस-कडेगाव मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. त्यामुळे संग्राम देशमुख यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. त्यावेळी विश्वजित कदम हे निवडून आले.
'हे' आहेत भाजपाचे उमेदवार -
भारतीय जनता पार्टीने विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या चार विभागातील उमेदवारांची नावे भाजपाकडून जाहीर करण्यात आली आहेत. शिरीष बोराळकर, संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख, औरंगाबादेतून शिरीष बोराळकर, नागपूरमधून संदीप जोशी आणि औरंगाबादेतून नितीन धांडे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा - पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाचे ४ उमेदवार जाहीर