सांगली - गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणारा तासगाव येथील ऐतिहासिक रथोत्सव आणि सांगलीतील विविध संस्थांनांची शाही मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच गणपती मिरवणुकीमध्ये खंड पडला आहे.
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार सांगलीच्या पटवर्धन पंचायतन संस्थान आणि तासगाव येथील गणपती संस्थानाकडून यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या दोन्ही संस्थांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुका रद्द करण्यात आली आहेत.
विशेषतः तासगाव येथील गणपती मंदिराचा रथोत्सव यंदा रद्द झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा रथोत्सव प्रसिद्ध आहे. यंदा रथोत्सवाचे हे 241 वे वर्ष होते. तत्कालीन परशुरामभाऊ पटवर्धन सरकारांकडून गणपती उत्सवाला सुरुवात करण्यात आली होती आणि दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी दगडीचाक असणारे भव्य रथ तयार करण्यात आला, त्यानंतर याठिकाणी रथोत्सव परंपरा सुरू झाली. तेंव्हापासुन या रथोत्सवास आणि दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी सांगली जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून हजारो भाविक उपस्थिती लावतात. हा रथ भाविकांनी ओढून घेऊन जाण्याची परंपरा आहे. मात्र शेकडो वर्षांची ही परंपरा यंदा मात्र पहिल्यांदाच खंडित होत आहे.
तर दुसऱ्या बाजूला सांगली शहरातल्या पटवर्धन गणपती पंचायतन संस्थानाचा गणपती उत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली संस्थानचे तत्कालीन पटवर्धन सरकार यांच्याकडून गणेशोत्सवाची परंपरा सुरू झाली. शाही मिरवणुकीने गणेशाचे आगमन आणि पाच दिवसानंतर शाही मिरवणुकीने गणेशाचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. वेगवेगळी वाद्य, घोडे, उंट या मिरवणुकीमध्ये सहभागी असतात. संपूर्ण सांगलीकर या शाही मिरवणुकीमध्ये दरवर्षी सहभागी होतात. मात्र यंदा ही शाही मिरवणूक पंचायतन संस्थांनकडून रद्द करण्यात आली आहे.