सांगली - शहरात गवा शिरल्याने नागरीक धास्तावले आहेत. विश्रामबागच्या गव्हर्नमेंट कॉलनी व कुंभार मळा येथे गव्याचा वावर दिसून आला. हा गवा नागरी वस्तीत कसा आला हे कळू शकले नाही. मात्र, सायंकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत हा गवा नागरी वस्तीत फिरत होता.
लोकवस्तीत गव्याच्या वावर -
गव्हर्नमेंट कॉलनीचे रहिवासी असलेले नागरिक शिक्षक नितेंद्र जाधव यांना हा गवा सर्वात प्रथम दिसला. त्यांनी गव्याचा पाठलाग करत नागरिकांना सतर्क केले. त्यांनी पोलिसांना देखील याची माहिती कळवली. गवा आल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. प्राणीमित्र, पोलीस आणि वन विभागाने याठिकाणी धाव घेतली. गव्याला नागरी वस्तीपासून निर्जन असणाऱ्या भागात हुसकावून लावण्यात आले.
अंधारात ऊसाच्या शेतातून गवा झाला गायब -
त्यानंतर अंधारात ऊसाच्या शेतात घुसत गवा गायब झाला. मात्र, आसपासच्या परिसरात गवा आल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून गव्याला निमार्गाच्या अधिवासात घालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी आणि गवा निदर्शनास आला तर वन विभागाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाचे अधिकारी सागर थोरावत यांनी केले आहे.