सांगली - जिल्ह्यात २२ मे पासून जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. जिल्हाअंतर्गत बस सेवा, सर्व दुकाने उघडण्यास जिल्हा प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, हॉटेल, मॉल्स, सार्वजनिक गर्दीचे ठिकाण हे बंदच राहणार आहेत. तसेच ज्यांच्याकडून कोरोनाचे नियम पाळले जाणार नाहीत अशांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले. ते चौथ्या लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
२२ मे पासून सांगली जिल्ह्यात सर्व दुकाने सुरू होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. महापालिका क्षेत्रात एक दिवसाआड अशा पार्श्वभूमीवर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता २२ तारखेपासून सकाळी १० ते सायंकाळी ५ सात वाजेपर्यंत सर्व दुकाने नियमित उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच जिल्हा अंतर्गत बस सेवाही सुरू करण्यात येणार आहे. ज्यामध्ये ५० टक्के प्रवाशी वाहतूक करता येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पान टपरी सुद्धा उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी केवळ विक्री करता येणार आहे. त्याठिकाणी पान, मावा, तंबाखू, खाऊन थुंकताना आढळल्यास संबंधित व्यक्ती आणि दुकानदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.
अंत्यविधीसाठी आता पन्नास लोकांना एकत्र येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला हॉटेल सार्वजनिक, सार्वजनिक ठिकाण, चित्रपट गृहे यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. ३१ मे नंतर त्यांच्या बाबतीत राज्य आणि केंद्र सरकारकडून निर्देश आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
२२ तारखेपासून सुरू होणारे सर्व दुकाने आणि उद्योग यांना सशर्त अशी परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्स आणि कोरोनाच्या बाबतीत घेण्यात येणारी खबरदारी याचे पालन संबंधित व्यक्ती अथवा दुकानदार यांनी करायची आहे. त्यामध्ये कोणतीही कसूर आढळल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.