सांगली - साखर कारखान्याच्या मांडीला मांडी लावुन बसलेल्या मंडळींनी कारखानादारांच्या विरोधातील नाटकी आंदोलन बंद करावी. शेतकऱ्यांना न्याय द्यावा, नसेल तर सरकारमधून बाहेर पडावे,असे आव्हान माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एफआरपीच्या प्रश्नावरून माजी खासदार राजू शेट्टी यांना दिले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाच्या एफआरपीवरूनआंदोलन करण्यात येत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात 25 जानेवारीपासून ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. या आंदोलनावरून माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला आहे. माजी कृषी राज्यमंत्री खोत म्हणाले की, केंद्र सरकारने ठरवलेल्या एफआरपीप्रमाणे कारखानदारांनी शेतकऱ्यांना अद्याप एफआरपी देणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप अनेक कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना दर दिला नाही.
हेही वाचा-एफआरपी आंदोलनाचा भडका; जयंत पाटलांच्या राजारामबापू कारखान्याचे कार्यालय पेटवले
आंदोलनाची नाटके बंद करा...
काही मंडळी साखर कारखान्याच्या मांडीला मांडी लावुन बसले आहेत. अशी मंडळी लोकांना दाखविण्यासाठी साखर कारखानादारांच्या विरोधात नाटकी आंदोलन करत आहेत .त्यांनी आंदोलन करण्याऐवजी ते सरकारमध्ये आहेत. त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा. ते जमत नसले तर सरकारमधून बाहेर पडावे. कारण, एका बाजूला सरकारमध्ये राहून दोन्ही हात तुपात ठेवायचे, दुसऱ्या बाजूला लोकांनी दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे. आता ते चोराच्या अळंदीला पोहचले आहेत. त्यांनी आता नाटके बंद करावीत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली.
हेही वाचा-काही लोक आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस खातात; सदाभाऊंचा शेट्टींना टोला
दरम्यान, जे कारखाने थकीत एफआरपी देणार नाहीत ते कारखाने सुद्धा सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता.