सांगली - राज्यात 10 लाख मॅट्रिक टन कांदा शिल्लक असल्याने, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाबाबत राज्यातील वस्तुस्थितीचा अहवाल तातडीने केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. निर्यातबंदीऐवजी निर्यात शुल्कवाढ असा निर्णय घेण्याची विनंतीही करणार असल्याचे मंत्री खोत यांनी सांगितले आहे. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या धोरणावर विरोधकांकडून टीका होत आहे. तर, शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे. राज्यात कांद्याच्या दरावरून अनेक वेळा प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावेळी राज्य सरकारकडून राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५०० कोटींहून अधिक रुपयांचे अनुदान दर कमी झाल्यामुळे देण्यात आले आहे. त्याचबरोबर कांदा साठवणूक करण्यासाठी राज्यात कांदा चाळी निर्माण केल्या असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. सध्याच्या स्थितीत कांदा चाळीत 10 लाख मॅट्रिक टन कांदा शिल्लक आहे. यामुळे राज्यातील कांद्याच्या स्थितीबाबत केंद्र सरकारला तातडीने सध्याच्या कांद्याच्या स्थितीचा अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री खोत यांनी दिली.