सांगली - राज्य सरकारची अवस्था "आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय"अशी असल्याची टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच तर चित्रा वाघ या चित्रातील वाघ नाहीत. तर त्या खऱ्या खुऱ्या वाघीण आहेत. तिच्या डरकाळीने तुमचे सरकार जमीनदोस्त होईल, अशी टीकाही आमदार खोत यांनी केली. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
'सरकारविरोधात बोलल्यास दाखल होतो गुन्हा'
राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खोत यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारची आजची अवस्था ही आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी झाली आहे. जर सरकारविरोधात कोणी तक्रार केली, तर त्याचावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात आणि तुरुंगात टाकण्यात येते.
'चित्रातील नव्हे, खरी वाघीण'
चित्रा वाघ यांच्या पतीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत बोलताना चित्र वाघ यांनी सरकारच्या विरोधात आवाज उठवला, त्यामुळे त्यांच्या पतीवर दीड वर्षानंतर बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. पण दीड वर्ष सरकार अफूच्या गोळ्या खाऊन झोपले होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र सरकारला इशारा देऊ इच्छितो, चित्राताई या चित्रातील वाघ नाहीत, त्या खऱ्या खुऱ्या वाघीण आहेत. त्यांना तुम्ही पिंजऱ्यात बंद करायाचा प्रयत्न केला तर त्यांच्या डरकोळीने तुमचे सरकार जमीनदोस्त होईल, असे खोत यांनी स्पष्ट केले.
'सरकारचे रामनाम सत्य होणार'
राज्यपाल नियुक्त आमदार विषयावर बोलताना, त्या आमदार नियुक्तीचा विषय राज्यपालांचा आहे. पण राज्य सरकारने विधानसभेचा अध्यक्ष पहिला निवडावा. पण आता आमचे अधिवेशन हे रेल्वेपटरीवरून चालले आहे. पण त्या रेल्वेला ड्रायव्हर नाही आणि क्लिनरमार्फत गाडी चालवली जात आहे. सरकार प्रत्येक गोष्टीमधून पळ काढत आहे. त्यांना माहीत आहे, आपले आमदार ऐकत नाहीत. एक ना एक दिवस रामनाम सत्य होणार आहे, त्यांना कळून चुकले आहे, अशी टीकाही खोत यांनी केली.