सांगली - सांगली जिल्हा परिषदेच्या महासभेत सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या मुद्द्यावरून हे वादंग झाले. कोरोना लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची खुली महासभा पार पडली आणि पहिल्याच सभेत झालेल्या गोंधळामुळे याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
सांगली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून पार पडली नव्हती आणि सोमवारी लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहामध्ये नेहमीप्रमाणे महासभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू झाल्यानंतर मागील इतिवृत्ताचे वाचनानंतर जलस्वराज्य इमारत विकसित करण्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा विषय निघताच सत्ताधारी भाजप आणि विरोधी कॉंग्रेस राष्ट्रवादी यांच्यामध्ये जोरदार गदारोळ सुरू झाला.
यावेळी अध्यक्ष प्राजक्ता कोरे आणि उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गटाचे सदस्य आक्रमक झाले आणि ते एकमेकांना भिडले. त्यामुळे सभागृहातील वातावरण तणावग्रस्त बनले होते. माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर आणि काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील यांच्यात यावेळी जोरदार वादविवाद होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे. यानंतर माजी उपाध्यक्ष सुहास बाबर आणि भाजपाचे सदस्य तमनगौडा रवी पाटील यांनी आक्रमक सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेरीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी सदर प्रकरणात शासनाच्या गाईडन्स पाळा, अशा सूचना दिल्या. त्यानंतर काहीसा तणाव निवळला. मात्र, या गदारोळामुळे सभागृहांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.