सांगली - संभाव्य पूरस्थिती लक्षात घेत महापालिकेकडून पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे. याचाच भाग म्हणून शहरातील पूर पट्ट्यातील रहिवाशांना स्थलांतर करण्याबाबतच्या नोटिसा बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त, महापौर आणि नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच पूर भागात वीज, पिण्याचे पाणी, औषधे तसेच मदतीसाठी साधनसामुग्री उपलब्ध करण्याची सूचना सर्वच नगरसेवकांनी या बैठकीत केली. मंगलधाम येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, विरोधीपक्षनेते उत्तम साखळकर, उपायुक्त राहुल रोकडे आदींसह पूर भागातील नगरसेवक उपस्थित होते.
पूर येण्याआधी स्थलांतर व्हा...
नगरसेवकांच्या सूचना महापौर सुर्यवंशी आणि आयुक्त कापडणीस यांनी जाणून घेतल्या. यामध्ये संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पुरबाधित भागातील नागरिकांनी पाणी वाढण्याअगोदर सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याबाबत नोटीस बजावण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच मनपाकडून कोणतीही नुकसानभरपाई दिली जाणार नाही, अशी नोटीस तात्काळ बजावण्याची सूचनाही सर्वच नगरसेवकांनी यावेळी केली.
पूरपरिस्थितीत सर्व साधन-सामग्री आणि सुविधा उपलब्ध ठेवा...
पूर काळात आवश्यक औषधे, साथीचे आजार उद्भवल्यास त्याबाबत लागणारी औषधे आताच उपलब्ध करण्याची सूचनाही केली. याचबरोबर पाणीपुरवठा करणारे पंप पाण्याखाली जातात. त्यामुळे शहरात असणाऱ्या बोअरिंगमध्ये विद्यूत मोटार बसवून तात्पुरता पाणीपुरवठा करता येईल, अशीही सूचना बैठकीत मांडण्यात आली.