सांगली - कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्या राजू शेट्टी यांची नाळ आता शेतकऱ्यांशी राहिली नसून दलाल, भांडवलदारांशी जुळलेली आहे, अशी सणसणीत टीका माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. 25 सप्टेंबरला या विधेयकाचे स्वागत शेतकरी राज्यभर गुढ्या उभारून करतील, असे स्पष्ट केले. ते सांगली मध्ये बोलत होते.
शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांनी वारंवार शेतीमाल नियमन मुक्तीची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. मात्र, मूठभर लोक आता याला विरोध करत आहेत. पण रयत क्रांती संघटना या कायद्याचे स्वागत करत असून या कायद्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. 25 सप्टेंबरला कृषी विधेयक विरोधात पुकारलेल्या आंदोलना विरोधात रयत क्रांती संघटना रस्त्यावर उतरले, अशी भूमिका आमदार खोत यांनी स्पष्ट केले आहे. त्याच दिवशी राज्यभर शेतकरी आपल्या शेतात, कायद्याचे स्वागत करतील,असे जाहीर केली.
राजू शेट्टींवर टीका..
शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विद्यार्थ्यांनी कृषी विधेयकाचे स्वागत आणि समर्थन केले आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेले विरोधाबाबत बोलताना खोत यांनी शेट्टींवर जोरदार निशाणा साधला आहे. राजू शेट्टी यांची नाळ आता शेतकऱ्यांशी राहिली नाही, दलाल,
व्यापारी आणि भांडवलदारांशी त्यांची जोडली गेली आहे, आणि राजू शेट्टी हे शरद जोशींच्या शाळेतील ते नापास विद्यार्थी आहेत. त्यांनी अभ्यास करुन परीक्षा द्यायला पाहिजे होते. मात्र, त्यांनी ती दिली नाही, त्यामुळे ते विरोध करत आहेत. आता शेतकरी स्वातंत्र्य लोकसभेत बहाल केले आहे. त्यामुळे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पण शेतकऱ्यांच्या लुटीसाठी सरसवणाऱ्या हातांना कंप सुटला आहे. या लुटारूच्या फौजांचे नेतृत्व राजू शेट्टी करत आहेत, ही शोकांतिका आहे, अशी टीका आमदार खोत यांनी केली.