सांगली - राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेविकेच्या पती विरोधात मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी नगरसेवकाने अखेर अॅट्रोसिटी तक्रार दाखल केली आहे. अभिजित हारगे यांच्या विरोधात नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी ही तक्रार सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
सांगली महापालिकेत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका यांचे पती अभिजित हारगे यांच्या सोबत झालेल्या वादानंतर आज राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी अभिजित हारगे यांच्या विरोधात सांगली शहर पोलिसांत ऑट्रोसिटी तक्रार दिली आहे. मिरजेच्या प्रभाग 20 मधील एका विकास कामाच्या मंजुरीवरून काही दिवसांपूर्वी सांगली महापालिकेत राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात आणि नगरसेविका संगीता हारगे यांचे पती अभिजित हारगे यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन धक्काबूक्कीचा प्रकार घडला होता.
ज्यामध्ये थोरात यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. यानंतर हा शहर पोलीस ठाण्यात गेला व मिटवण्यात आला होता. मात्र, आज नगरसेवक थोरात यांनी अभिजित हारगे यांनी आपणांस जातीवाचक शिवीगाळ केल्याचे सांगत सांगली शहर पोलिसात ऑट्रोसिटी तक्रार दिली आहे.
थोरात यांच्या तक्रारीनंतर शहर पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर आणि शहर पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील व पोलिस कर्मचारी यांनी महापालिकेच्या समाजकल्याण कार्यालयात जाऊन घटनास्थळी पंचनामा केला. महापालिका मुख्यालयाच्या नगर अभियंता कार्यालयात हा प्रकार घडल्याने पोलिसांनी त्या कार्यालयातही जाऊन घटनेचा पंचनामा केला.