सांगली - 'ईटीव्ही भारत'च्या बातमीची दखल घेत ब्रम्हनाळ दुर्घटनेची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टींनी केली आहे. आपण स्वतः पूरपरिस्थितीत ब्रम्हनाळ गावाला बोटी पुरवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाच्या बेफिकीर वृत्तीमुळे निष्पाप नागरिकांचा जीव गेला असा आरोपही राजू शेट्टी यांनी सांगलीत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे.
सांगलीच्या ब्रम्हनाळ येथे महापुरात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला एक महिना उलटून गेला आहे. मात्र, या दुर्घटनेत दोष कुणाचा? मुख्यमंत्र्यांच्या चौकशीचे पुढे काय झाले? असे प्रश्न उपस्थित करत 'ईटीव्ही भारत'ने याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे.
वास्तविक ब्रम्हनाळ या ठिकाणी महापूर आला असताना या गावाला यांत्रिक बोटी पुरवण्याची मागणी आपण स्वतः जिल्हा प्रशासनाकडे केली होती. मात्र आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आपला जीव वाचण्यासाठी तेथील नागरिक मिळेल त्या साधनाने पुरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी ही दुर्घटना घडून 17 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. खरंतर प्रशासनाची बेफिकिर वृत्ती याला कारणीभूत असल्याचा आरोप करत कदाचित प्रशासनाला कळले नाही की, ब्रम्हनाळ याठिकाणी पूर आहे, असा टोला शेट्टी यांनी जिल्हा प्रशासनाला लगावला. ब्रम्हनाळ घटनेची सखोल चौकशी होऊन यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
हेही वाचा- ब्रह्मनाळ दुर्घटनेला दोषी कोण? महिन्यानंतरही मुख्यमंत्र्यांची चौकशीची घोषणा हवेतच