सांगली - लॉकडाऊनमुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी विक्रीचे व्यवहार सध्या बंद आहेत. मात्र, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सुचनेनंतर जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन सौदे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार 29 एप्रिलपासून हळदीचे ऑनलाईन व्यवहार यशस्वीरित्या सुरू झाले. त्यानंतर आता बेदाण्यांचेही ऑनलाईन सौदे सुरु झाले आहेत. बुधवारी सांगली बाजार समितीच्या आवारातील हॉलमध्ये बेदाण्यांच्या ऑनलाईन सौद्यांना सुरुवात झाली. यात पहिल्याच व्यवहारात तब्बल 940 क्विंटल बेदाण्यांची विक्री झाली.
हेही वाचा... धक्कादायक : आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या बैठकीत उपस्थित असलेले दोन अधिकारीच कोरोनाबाधित
बाजार समितीत 125 बेदाण्यांचे नमुने पाहणीसाठी ठेवण्यात आले होते. खरेदीदारांनी दुपारी 1 ते 2 या एका तासात सर्व नमुने पाहून त्यांनी ऑनलाईन बोली लावली. हे ऑनलाईन व्यवहार होत असताना उपस्थित शेतकरी आणि खरेदीदारांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत सौदे पार पाडले आहेत. ज्यामध्ये साधारण 25 व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच सुरू झालेल्या या सौद्यामध्ये 940 क्विंटल बेदाण्याची विक्री झाली असून 185 प्रती किलो उच्चांकी तर सरासरी 140 ते 165 रुपये प्रती किलो इतका दर मिळाला आहे.
लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता. त्यातच अवकाळी पावसाचा कहर होऊन द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाल्या आणि यातून सावरण्यासाठी द्राक्षबाग शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळला होता. त्यामुळे आता बेदाण्यांतून द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे बेदाण्याचे सौदे होतील की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर होता. परंतु बेदाण्यांचे ऑनलाईन सौदे सुरू झाल्याने अडचणीत सापडलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.