सांगली - चालत्या खासगी बसला अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली. कराड-रत्नागिरी राज्य मार्गावर शिराळा तालुक्यातील मेणी फाटा येथे शनिवारी (दि. 21 डिसें) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र, प्रवाशांचे सर्व साहित्य जळाल्याने यात लाखोंचे नुकसान झाले आहे.
चांदोली येथून 40 प्रवाशांना घेऊन मुंबईकडे निघालेली खासगी बस (क्र. एम. एच. 48 के. 9898) मेणी फाटा येथे आल्यानंतर अचानक बसच्या खालच्या भागाला आग लागली. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस तातडीने रस्त्याच्याकडेला घेतली. आग वाढत असल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने बसमधून बाहेर उड्या मारल्या. तसेच प्रवाशांनाही बसमधून बाहेर येण्यास सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रवाशीही गाडीतून खाली उतरले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. त्यात बस जळून खाक झाली. आगीत बसमधील प्रवाशांचे साहित्यही जळून खाक झाले. त्यामुळे प्रवाशांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
कराड-रत्नागिरी राज्यमार्गावरील या घटनेमुळे 2 वर्षांपूर्वी घडलेल्या गोवा-कोल्हापूर मार्गावरील घटनेची आठवण ताजी झाली. 24 नोव्हेंबर, 2017 रोजी गोवा-कोल्हापूर मार्गावर पहाटे तीनच्या सुमारास लक्झरी बसला आग लागून त्यात दोघांचा होरपळून मृत्यू झाला होता.
हेही वाचा - शेतकरी कर्जमाफी भ्रमनिरास करणारी, सरसकट कर्जमाफी करा अन्यथा आंदोलन - रघुनाथ पाटील
शिराळा तालुक्यातील लोक नेहमी मुंबईवरून गावाकडे ये-जा करत असतात. त्यामुळे चांदोलीहून मुंबई आणि मुंबईहून चांदोली अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसची संख्या मोठी आहे. आगीसारख्या दुर्घटनेमुळे खासगी बसमधून प्रवास करणे धोक्याचे ठरू लागले आहे.
हेही वाचा - NRC व CAB विरोधात मिरजेत निघाला लक्षवेधी सर्वधर्मीय मोर्चा