सांगली - कृष्णा आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कायम असल्याने जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नद्यांना पूर आला आहे. सध्या कृष्णा नदीचे पाणी थोड्याफार प्रमाणात ओसरले आहे. मात्र, आज सायंकाळ पर्यंत कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चार दिवसांपासून कोयना, कृष्णा आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कायम असल्याने, सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. कृष्णा नदीची 36 फुटांवर पोहोचलेली पातळी पाण्याची सध्या एक फुटाने कमी झाली आहे. मात्र, कृष्णा नदीला आलेल्या पुराने सांगलीतल्या सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे सुमारे 50 घरे पाण्याखाली गेली होती. पालिका प्रशासनाकडून या कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले होते. कृष्णाची पाणी पातळी थोडीफार असरल्याने या भागातील पाणी ओसरला आहे. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीपात्रातील अनेक छोटे-मोठे बंधारे पाण्याखाली आहेत.त्यामुळे जवळचा संपर्क काही गावांचा तुटला आहे.
शिराळा तालुक्यातील वारणा नदीलाही पूर आला आहे. पात्राबाहेर पडलेल्या वारणेच्या पाण्यामुळे नदीकाठची हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. शिराळा आणि वाळवा तालुक्यातील दोन पूल आणि चार छोटे बंधारे पाण्याखाली गेल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा जवळचा संपर्क तुटला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम असून चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. 34 टीएमसी असणाऱ्या धरणात सध्या 28 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरणातून वाढणारी पाणी पातळी लक्षात घेता, प्रशासनाकडून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने कोयना धरणातूनही सायंकाळपर्यंत कृष्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. संततधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणारे पाणी या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सांगली जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.