सांगली - कोरोना रुग्णांच्या उपचारात प्लाझ्मा उपचार पद्धती वरदान ठरत आहे. त्यामुळे लवकरच ब्लड बँकेप्रमाणे प्लाझ्मा बँक तयार केली जाईल. अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णालयाने आवश्यक तितकी वैद्यकीय संरक्षक सामग्री उपलब्ध ठेवणे बंधनकारक केले असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. ते आज (सोमवार) सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 च्या अनुषंगाने पार पडलेल्या या आढावा बैठकीसाठी सहकार व कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाधता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे आदी अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा... #Covid-19: प्लाझ्मा थेरपी आणि कोरोनावरील उपचारांसंबंधी...
कोरोना रुग्णांवर उपचार करताना प्लाझ्मा उपचार पद्धत परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले आहे. ही उपचार पद्धत अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे लवकरच ब्लड बँकेच्या धर्तीवर प्लाझ्मा बँकही सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काय आहे प्लाझ्मा उपचार पद्धत...
कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी ब्लड प्लाझ्मा थेरपी परिणामकारक ठरत आहे. भारतात देखील यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अनेक रुग्णांना या थेअरपीचा फायदा होत असल्याचे निष्पन्न होत आहे. कोरोनाची लागण झालेला रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या दोन चाचण्या घेतल्या जातात. त्याच्या दोनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर चौदा दिवसांनी पुन्हा एकदा त्याच्या रक्ताची तपासणी केली जाते. यावेळी त्याच्या रक्तामध्ये अँटीबॉडीजचे घटक (घातक विषाणूंना नष्ट करणारा रक्तातील घटक) शिल्लक आहेत का, हे तपासले जाते. जर या व्यक्तीच्या रक्तांमधील अँटीबॉडी या एका ठराविक पातळीहून अधिक असतील, आणि या व्यक्तीचे वजन ५५ किलोंहून अधिक असेल, तर त्याच्या रक्तामधील ८०० मिलीलीटर प्लाझ्मा काढला जातो. हा प्लाझ्मा नंतर चार भागांमध्ये विभागला जातो. यामधील २०० मिलिलीटर प्लाझ्मा हा गंभीर रुग्णांवरती उपचार करण्यासाठी वापरला जातो.
महाराष्ट्रातील या रुग्णालयांना प्लाझ्मा थेरपीची परवानगी...
कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर प्लाझ्मा थेरपी कोरोनाबाधितांवर उपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने देशभरातील 21 रुग्णालयांना प्लाझ्मा थेरपीची परवानगी दिली आहे. त्यापैकी राज्यातील 5 रुग्णालयांचा समावेश आहे.
- बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, महाराष्ट्र
- पुणे रुग्णालय व संशोधन केंद्र, पुणे, महाराष्ट्र
- सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई, महाराष्ट्र
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, महाराष्ट्र
हेही वाचा... मुंबईतील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी; ...तर पुण्यातही प्रयोग शक्य