मिरज - येथे झालेल्या खूनप्रकरणी आरोपीस अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. संशयित आरोपी हा मृत व्यक्तीचा मावसभाऊ असल्याचे समोर आले आहे. पैश्यासाठी तगादा लावल्याचा मानसिक त्रासातून हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास
मिरज शहरामध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. धारदार शस्त्राने वार करून मुनीर मुसा शेख (वय 36) या व्यक्तीचा खून झाला होता. दरम्यान, या घटनेची नोंद महात्मा गांधी पोलीस चौकीमध्ये झाली होती. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू करण्यात आला होता. अवघ्या काही तासांमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरजेतून राजू शेख व्यक्तीस अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपी राजू शेख हा त्याचा मावसभाऊ असल्याचे समोर आले आहे.
मानसिक त्रासातून कृत्य
राजू शेख याच्याकडे मृत मुनीर शेख याने पैसे देण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे मानसिक त्रास होत असल्याने हा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी दिली आहे