सांगली - जिल्ह्यात गुरुवारी आणखी नव्या ९ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ८ कोरोना रुग्ण हे बरे झाले आहेत. त्यातील दुपारी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, तर ३ जण कोरोनामुक्त झाले होते. रात्री उशिरा आणखी नव्या ५ जणांची यामध्ये भर पडली आहे. तर उपचार सुरू असलेले ५ कोरोनाबाधfत हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ५१ तर आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ही १३३ झाली आहे.
नव्याने ५ जणांना कोरोनाची लागण झालेल्यांपैकी दोघा एसटी चालकांचा समावेश आहे. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि शिराळा तालुक्यातील ५ जणांचा नव्याने कोरोनाबाधित झालेल्यांमध्ये समावेश आहे. यात शिराळा तालुक्यातील मणदूर येथील एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या पत्नी व मुलीला तर आटपाडीच्या करगणी येथील एका एसटी चालकाला, खानापूरच्या लेंगरेवाडी येथील एका एसटी चालकाला आणि कवठेमहांकाळच्या कदमवाडी येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
ज्या दोघा एसटी चालकांना कोरोनाची लागण झाली आहे, ते दोघे हे आटपाडी आगारातून तालुक्यात अडकलेल्या छत्तीसगडच्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी एसटी घेऊन गेले होते. या सर्वांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
तर गुरुवारी कोरोना उपचार घेणारे ८ जण हे कोरोना मुक्त झाले आहेत. दुपारी ३ जण हे कोरोना मुक्त झाले होते. रात्री उशिरा आणखी ५ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये खानापूर तालुक्यातील सुलतानगदे येथील ५७ वर्षीय महिला, शिराळा तालुक्यातील करूंगली येथील ३३ वर्षीय पुरुष, कडेगावच्या आंबेगाव येथील ३६ वर्षीय पुरुष, आटपाडीच्या कामत येथील ५४ वर्षीय महिला आणि कवठेमहांकाळच्या नरसिंहगाव येथील ८ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे .
त्यामुळे सांगली जिल्ह्यातील उपचार घेणारी कोरोना रुग्ण संख्या ही ५१ झाली आहे. तर आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णसंख्या ही १३३ झाली आहे. तर आज अखेर ७८ जण हे कोरोना मुक्त झाले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे .