सांगली - जिल्ह्यात मंगळवारी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या तीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये २ महिला आणि १ पुरुषाचा समावेश आहे. यातील दोघे हे सांगली महापालिका क्षेत्रातील तर एकजण जत तालुक्यातल्या अंकले येथील आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्याही 11 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा धोका कायम असून एकाच दिवसात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी सायंकाळी उशिरा या तिघांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात सांगली शहरातील फौजदार गल्ली येथील एक महिला, मिरजेतील होळी कट्टा भागातील एक महिला आणि जत तालुक्यातील अंकले येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
यापैकी जत तालुक्यातल्या अंकले येथील व्यक्ती हा मुंबईवरून आलेल्या एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता. सांगलीच्या फौजदार गल्लीतील महिला ही मुंबईवरून आल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, मिरजेतील महिला ही धुणे-भांड्याचे काम करत असून ती कोणाच्या संपर्कात आली हे अद्याप अस्पष्ट आहे. प्रशासनाकडून तातडीने सांगली आणि मिरजेतील कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. तर, पोलिसांनी कोरोनाबाधित व्यक्ती राहत असलेल्या परिसराला सील करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात एकाच दिवसात ३ कोरोना रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या तीनही रुग्णांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. तर, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढतच असून तो आता 11 वर पोहोचला आहे.