सांगली - केंद्र सरकारकडून खतांच्या किंमतीमध्ये करण्यात आलेल्या वाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत खतांच्या दरांमध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्यात असल्याचे जाहीर केले आहे.
सध्या देशात पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी लॉकडाऊनच्या परिस्थितीशी लढत आहे. भाजपा सरकारने संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर खतांच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. केंद्राकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका घेणे गरजेचे होते. अशात खतांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आलेली आहे.
'केंद्र सरकारकडून पाप होतेय...'
केंद्र सरकारकडून खतांच्या किंमती वाढवण्याचे पाप करण्यात आले आहे. आज प्रत्येक खतांच्या दरात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे. या खतांच्या दरामध्ये केलेल्या वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात आंदोलन करणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केंद्र सरकारने वाढवलेले दर कमी करण्याची मागणीही केली आहे.