सांगली - इस्लामपूर नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाकडून नगरपालिका महिला मुख्याधिकारी यांना दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोन असणाऱ्या इस्लामपूरमध्ये नगरपालिकेच्या घंटा गाडीतून दारू वाहतूक कारवाई प्रकरणावरून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवका विरोधात मुख्याधिकारी यांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये २६ कोरोना रुग्ण आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरात गेल्या एक महिन्यापासून हायअलर्ट आहे. प्रशासनाकडून इस्लामपूर शहर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. अशा स्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीच सेवा सुरू नये. मात्र, इस्लामपूर शहरांमध्ये चक्क इस्लामपूर नगरपालिकेच्या घंटा गाडीमधून दारूची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
या प्रकरणी नगरसेवक अमित ओसवाल यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी संबंधित वाहनावरील ठेकेदारी कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश, संबंधित मुकादमाला दिले होते. तर यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक खंडेराव जाधव यांनी मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांना फोन वरून घंटागाडीबाबत नक्की कशासाठी कारवाई करत आहे? अशी विचारणा केली. यावर मुख्याधिकारी पवार यांनी पालिकेची प्रतिमा मलीन होत आहे, या प्रकरणात मी कोणत्याही नगरसेवकांचे नाव किंवा चोरटी दारू वाहतूक होत आहे याचा उल्लेख केलेला नाही, असे उत्तर दिले. काही वेळात नगरसेवक खंडेराव जाधव हे नगरपालिका कार्यलयात पोहचले. त्यांनी मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांचाशी वादविवाद सुरू करत त्यांच्या अंगावर खुर्ची घेवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच 'तुझे घराबाहेर निघणे मुश्किल करतो, तुला व तुझ्या कुटुंबाला बघून घेतो' अशी धमकी देत एकेरी भाषेचा वापर केला. या प्रकरणी मुख्याधिकारी पवार यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नगरसेवक खंडेराव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करत. जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, महिला आयोगाला घडलेल्या घटनेबाबतचे पत्र देत आपल्या जीविताला धोका असल्याचे कळवले आहे. तर मुख्याधिकारी प्रज्ञा पवार आणि नगरसेवक खंडेराव जाधव यांच्यात घडलेल्या या घटनेमुळे इस्लामपूर शहरात खळबळ उडाली आहे.