सांगली - पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उद्घाटनाचा वाद आता पेटला आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा संघर्ष स्मारक उद्घाटनावरून सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाने स्मारकाच्या ठिकाणी दोन एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. राष्ट्रवादीकडून 2 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी विरोध म्हणून भाजपाने 27 मार्च रोजी उद्घाटन करणार असल्याचं जाहीर केला आहे. त्यामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उद्घाटनाबाबत काय भूमिका घेणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्मारक परिसरात संचारबंदी लागू - अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं दोन एप्रिल रोजी उद्घाटन होणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस कडून जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपाने त्याआधी 27 मार्च रोजी उद्घाटन करणार असल्याचं जाहीर केले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या ठिकाणी 25 मार्च मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे.जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी स्मारक परिसरात 2 एप्रिल रात्री 10 वाजे पर्यंत 144 कलाम लागू करत स्मारक परिसरात विनाकारण गटागटाने आणि जमावाने या ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे.
पोलीस बंदोबस्त - तसेच स्मारक परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजवणे, फलक लावणे याला मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्मारक परिसरात कोणत्याही प्रकारचे मंडप प्रशासनाच्या परवानगीशिवाय घालता येणार,नसल्याचे स्पष्ट करत महापालिका प्रशासनाला स्मारकाच्या परिसरात बॅरीकटिंग लावण्याबरोबर काळजी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिल्या आहेत. संचारबंदी लागू आदेशानंतर अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी-भाजपा वाद? - सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्यावतीने विजयनगर याठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे.सुमारे अडीच कोटी रुपये निधी खर्च करून स्मारक पूर्ण झाले आहे.मात्र या स्मारकाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असा श्रेयवादाचा संघर्ष सुरू आहे.सांगली महापालिकेतील सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र या उदघाटन सोहळ्याला महापालिकेतील भाजपाने विरोध केला आहे.
भाजपाच्या नेत्यांना निमंत्रण नाही - सर्वपक्षीय कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षीय पातळीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप करत उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्घाटन सोहळा आयोजित करताना भाजपाच्या कोणत्याही मोठ्या नेत्याला निमंत्रण देण्यात आलं नाही अथवा महापालिकेतील भाजपा नगरसेवकांना विश्वासात देखील घेतलं नाही,असा देखील आरोप महापालिकेतील भाजपा नगरसेवकांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या आधी भाजपाचा उद्घाटन कार्यक्रम! - दरम्यान उद्घाटनाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील सर्व भाजपा नेत्यांनी बैठक घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली 27 मार्च रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्याचं जाहीर केले आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपाच्या स्थानिक आमदार,नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासोबत अहिल्यादेवी होळकर स्मारकाची पाहणी करत 27 मार्च रोजी धनगर समाजातील या मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याचे जाहीर केलं आहे.
भाजपा काय भूमिका घेणार? - राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी श्रेयावादाची लढाई सुरू झाली आहे. यामुळे प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या उद्देशाने अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आता भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या दिवशी उद्घाटन सोहळा होणार की ? राष्ट्रवादी कडून शरद पवारांच्या उपस्थिती लोकार्पण सोहळा पार पडणार, याच बरोबर संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आता काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.