सांगली - गेल्या महिनाभरापासून भाजपमध्ये सुरू असलेल्या उमेदवारीचा तिढा जवळपास सुटत आला आहे. सांगलीमध्ये आज (गुरुवारी) भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. विद्यमान भाजप खासदार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत नेत्यांची दिलजमाई झाल्याचे स्पष्ट झाल्याने खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
भाजपचे बंडखोर उमेदवार गोपीचंद पडळकर यांची समजूत काढण्यासाठी भेट घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. सांगली लोकसभेसाठी भाजपमध्ये गेल्या महिनाभरापासून अंतर्गत गटबाजीमुळे विद्यमान खासदारांच्या उमेदवारीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पक्षातील अनेक नेत्यांनी खासदारांच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे खासदार यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न निर्माण झाला होता. अंतर्गत गटबाजीचा फटका बसू नये, त्यामुळे भाजपाकडून उमेदवार चाचपणी सुरू होते. मात्र, अखेर संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगलीत पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटी बैठकीवरुन दिसून आले आहे.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेचे ४ आमदार, खासदार संजयकाका पाटील आणि प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांची सांगलीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूरमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या प्रचार शुभारंभाबाबत नियोजन करण्यात आले. या सभेसाठी प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर राहतील, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाचाही प्रचार शुभारंभ होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
येत्या २ दिवसात सांगलीच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय असून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी सांगलीची लोकसभेची जागा निवडून येईल, असा विश्वास यावेळी देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांची आपण सर्वजण भेट घेणार असून त्यांची समजूत काढण्यात येईल, असा विश्वासही यावेळी देशमुख यांनी स्पष्ट केला. त्याबरोबरच जिल्ह्यातील इतर पक्षातील भाजप पक्षप्रवेश प्रश्नावर बोलताना सध्याच्या स्थितीत यावर बोलणे योग्य होणार नाही, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे त्याबाबत बोलतील असे त्यांनी स्पष्ट केले.