सांगली - केंद्र सरकारच्या पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आम आदमी पार्टीकडून अर्धनग्न पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. पेट्रोल शंभराच्या पार गेल्यामुळे देशभरात इंधन दरवाढीचा निषेध आणि संताप व्यक्त होत आहे. सांगलीतही आम आदमी पार्टीकडून रविवारी आंदोलन करण्यात आले. शहरातल्या एसटी स्टँड रोडवरील चालक-मालक पेट्रोल पंपासमोर हे आंदोलन करण्यात आले.
अर्धनग्न पध्दतीने आंदोलन
सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला दिव्य स्वप्न दाखवली होती. पेट्रोल 35 रुपये लिटर दराने देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता अद्याप केलेली नाही. आज जनतेच्या अपेक्षा भंग करून त्यांना महागाईच्या खाईत लोटण्याचे काम मोदी सरकारकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सर्व सामान्यांच्या अंगावरील कपडेसुद्धा काढून घेऊन त्यांना चड्डी-बनियनवर आणायचे काम सुरू असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने यावेळी केला आहे.