सांगली - सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, तसेच प्रशासनानेही योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर अलमट्टी धरणातून पाण्याच्या विसर्गावर राज्य सरकार लक्ष ठेवून असून कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याची विनंतीही करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
'परिस्थिती अवघड बनू नये, म्हणून धरणातून विसर्ग'
कोयना, वारणा आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार असल्याने वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन नदीला पूर आला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीलाही पूर आला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
'नागरिकांनी वेळीच स्थलांतर करावे'
धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत आहे. मोठ्या प्रमाणात धरणात पाण्याची आवक होत असल्याने, धरणातून पाणी सोडणे गरजेचे आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. जर आता पाणी सोडले नाही, तर पुन्हा परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पडणारा पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि संभाव्य पाऊस पाहता परिस्थिती अवघड बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी वेळीच स्थलांतर करावे, त्याचबरोबर प्रशासनानेही योग्य त्या खबरदार्या घ्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले आहे.
'कर्नाटक सरकारच्याही संपर्कात'
कोयना, वारणा धरणात पडणाऱ्या पावसाचे आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची वेळोवेळी माहिती घेण्यात येत आहे. त्याचबरोबर कृष्णा नदीपात्रातून कर्नाटकाच्या अलमट्टीकडे जाणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचीही माहिती घेऊन कर्नाटक सरकारबरोबर अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याबाबतची विनंती करण्यात आली आहे.