सांगली - ‘कोरोनाच्या परिस्थितीमध्ये परप्रांतीयांचे सर्व व्यवस्था करून विविध राज्यामध्ये जाण्यासाठी एस. टी. बस आणि रेल्वेची अत्यंत चांगली सेवा शासनाने पार पाडली आहे. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यात महाराष्ट्र शासन संपूर्ण देशात अग्रेसर आहे. त्यामुळे मी शासनाचा मनपूर्वक आभारी आहे,' असे गौरवोद्गार वसंतदादा कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांनी काढले. ते मिरजेच्या तानंगमध्ये बोलत होते.
लॉकडाऊनमुळे मिरज तालुक्यातील तानंग या गावामध्ये मजुरी निमित्ताने असलेले झारखंड राज्यातील बावीस लोक अडकून पडले होते. रेल्वेमधून प्रवासासाठी त्यांनी शासनाकडे खूप प्रयत्न केले. परंतु, मिरजहून झारखंडसाठी कोणतीही रेल्वे गाडी धावणार नसल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे मजूर भयभीत झाले होते. आपल्या गावी परतण्यासाठी पायी चालत जाण्याची तयारी या कामगारांनी केली होती. याबाबत गावातील व्यापारी मधूसुदन मालू व दीपक पाटील यांनी तत्काळ वसंतदादा पाटील साखर कारखाना चेअरमन विशाल पाटील यांची भेट घेऊन परप्रांतीयांची समस्या कानावर घातली.
विशाल पाटील यांनी तहसीलदार किशोर घाडगे, नायब तहसीलदार राजमाने, झोनल अधिकारी नितीन जमदाडे, व एसटीच्या डी. सी. अधिकारी ताम्हणकर मॅडम यांच्याशी याबाबत चर्चा करून तानंग ते गोंदियापर्यंत (झारखंड हद्द) विशेष एस. टी. बसची सोय उपलब्ध करून दिली. यानंतर बुधवारी सर्व मजूर झारखंडकडे विशेष बसने रवाना झाले आहेत. यावेळी या मजूरांना खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या तसेच विशालदादा युवा प्रतिष्ठानतर्फे सॅनिटायझर बाटलीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विशाल पाटील यांच्या हस्ते बसचे पूजन केले. सर्व प्रवाशांना निरोप देण्यात आला. यावेळी झारखंड मधील मजूरांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत.