सांगली - पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या विजयाचा जल्लोष सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून मिरज रोडवरील राष्ट्रवादी शहर कार्यालयासमोर तर, काँग्रेसकडून शहरातील काँग्रेस कमिटीसमोर जल्लोष करण्यात आला.
फटक्यांची आतिषबाजी, गुलाल उधळण, साखर वाटप आणि वाद्यांच्या गजरात राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला आहे. यावेळी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विजयोत्सवा मध्ये सहभाग घेत महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा - बच्चू कडूंनी कंबर कसली ; आज मोझरीतून हजारो शेतकरी राजधानीकडे होणार रवाना
ही तर भविष्यातील नांदी
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय बजाज यावेळी म्हणाले, पुणे पदवीधर किंवा अन्य ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. त्यामुळे राज्यातील भाजपविरोधात जनतेमध्ये किती रोष आहे, हे स्पष्ट झाले आहे. तसेच, आतापर्यंत पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ हा भाजप आपला सातबारा असल्याप्रमाणे समजत होता. मात्र, यंदा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी चंग बांधत करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्यामुळे भाजपचा पराभव झाला आहे आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा महाराष्ट्रातील नवीन नांदी आहे. यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि सर्व घटक पक्ष मिळून निवडणुका लढवतील आणि भाजपला हद्दपार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आतापर्यंत बटनाचा खेळ झाला
विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कमलाकर पाटील म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही, हे जनतेला आता कळून चुकले आहे.आणि आता पर्यंत पुणे पदवीधर मतदारसंघात मक्तेदारी करून भाजप निवडून येत होते. मात्र यंदा मोठ्या संख्येने मतदार नोंदणी झाली होती. कारण, भाजपवर जनतेचा रोष होता. आजपर्यंत आमदार-खासदार निवडणूकीमध्ये बटनावर खेळ करून निवडून आले आहेत. मात्र, आता पहिल्यांदा निवडणूक झाली असे वाटले आहे, असे मत यावेळी कमलाकर पाटील यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जागर आंदोलन; शेतकरी आंदोलनाला दर्शविला पाठिंबा