वाळवा (सांगली) - गावात आलेले नेते मंडळी नारळ फोडून विविध कामांचे उद्घाटन करत असल्याचे पाहून एका लहान मुलालाही नारळ फोडण्याची इच्छा झाली. त्याने थेट राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडेच आपली इच्छा बोलून दाखवली. जयंतराव पाटलांनीही क्षणाचाही विलंब न करता त्या लहानग्याच्या हातात श्रीफळ दिले. यावेळी श्रीफळ वाढवतानाचा त्या लहानग्याच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहिला नाही.
वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन सुरू असताना सहा वर्षीय संचित गावडे हा मुलगाही तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडताना पाहून चिमुकल्या संचितलाही मोठे कुतूहल वाटले. मोठी हिम्मत करुन करून संचितने, थेट जलसंपदा मंत्री जयंतरावांकडे, 'साहेब... मी पण फोडू का नारळ?' अशी विचारणा केली. लहान मुलाची ही निरागस मागणी जयंतरावांनी लागलीच पूर्ण केली. नारळ फोडतानाचे संचितचे स्मित हास्य पाहण्याजोगे होते, असे जयंतराव म्हणाले.
दोन दिवसांत ४१ कोटींच्या विकास कामांचा धडाका
मंत्री जयंतराव पाटील शनिवारपासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. त्यांनी दोन दिवसात तब्बल ४१ कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन केले.
रविवारी सकाळीच वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा- दुधगाव रस्ता, बागणी - ढवळी - बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव - भडखंबे - बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचा उद्घाटन करण्यात पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.