सांगली - भाजपा सारख पुढचं बोलायची आम्हाला सवय नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil Critisized BJP ) यांनी भाजपाला टोला लगावात सांगली जिल्ह्यातल्या भाजपा नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाचे संकेत दिले आहेत. सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन ( Inauguration of Ahilya Devi Holkars Memorial ) राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी 2 एप्रिल रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी स्मारकाच्या ठिकाणी पाहणी केली आहे.
स्मारक उद्घाटन सोहळा तयारीची पाहणी - दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित स्मारक उद्घाटन सोहळा 2 एप्रिल म्हणजेच उद्या शनिवारी पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सांगलीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे पाहणी केली आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा मंत्री जयंत पाटील आणि अण्णासाहेब डांगे यांच्याकडून घेण्यात आला.
शरद पवारांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन - यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, शिराळयाचे भाजपाचे माजी आमदार व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा शिराळा याठिकाणी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामधील असणारे आरोग्य केंद्र ही मॉडेल आरोग्य केंद्र करायची असं ठरवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य आणि उप आरोग्य केंद्र याठिकाणी फाईव स्टार सुविधा असणारा प्रकल्प तयार केला आहे. त्याची सुरुवातदेखील शरद पवारांच्या हस्ते होणार आहे. तसेच सर्वात मुख्य कार्यक्रम म्हणजे सांगली उभारण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठी अनेक मंत्री आणि नेते व मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
'भाजपा सारख पुढचं बोलायची सवय नाही' - जिल्ह्यातील आणखी भाजपा नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश प्रश्नावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, भाजपा सारख पुढचं बोलायची आम्हाला सवय नाही. मात्र, जसं जसं घडामोडी घडतील. त्याची माहिती आम्ही नक्की देऊ, अश्या शब्दात मंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील आणखी काही नेते राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याचे संकेत दिले.
कुठे काय करायचे? हे शहाणपण शिकले पाहिजे - माजी मंत्री अण्णासाहेब डांगे म्हणाले, माणसाला राजकारण कुठं करायचे आणि समाजकारण व धर्मकारण कुठे करायचं, हे शहाणपण शिकलं पाहिजे, असं आपले मत असल्याचे सांगत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी होळकर स्मारक उदघाटन प्रकरणी केलेल्या आंदोलनावरून पडळकर यांना टोला लगावला आहे.
स्मारकावरून भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष - सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्यावतीने विजयनगर या ठिकाणी सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या उद्घाटनावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला होता. ज्यातून शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटनाला विरोध दर्शवत 27 मार्च रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आंदोलन केलं होतं.
हेही वाचा- पुण्यात दहावीच्या विद्यार्थ्याने केला असा प्रताप.. शिक्षिकेचे अश्लील व्हिडिओ केले शूट