सांगली - राज्यात सीबीआयने मर्यादेचे उल्लंघन करून अनिल देशमुख यांच्यावर एफआयआर दाखल केली आहे. हा भाजपाचा राजकीय कट असल्याचा, आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. देशात आणि राज्यात मोगलाई लागल्याची परिस्थिती निर्माण झाल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
सीबीआयकडून कायद्याचा भंग -
100 कोटी मागणी प्रकरणी सीबीआयने शनिवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि सीबीआयच्या कारभारावर सडकून टीका केली. अनिल देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेला सीबीआयचा छापा म्हणजे भोंगळ कारभार आहे. अगोदर एफआयआर दाखल करण्यात आली आणि मग छापा टाकला. म्हणजेच छापा टाकण्यासाठी एफआयआर दाखल केली गेली. हा सर्व प्रकार सीबीआयच्या मर्यादांचे उल्लंघन करणारा आहे. सीबीआयकडून कायद्याचा भंग करत ही कारवाई झाली असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
कोरोनाच्या स्थितीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी छापा -
सध्या देशात आणि राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असताना केंद्र सरकारने देशातील सर्व ऑक्सिजन प्लांट आपल्या नियंत्रणाखाली घेतले आहेत. महाराष्ट्र सरकारला या अगोदर जवळून ऑक्सिजन पुरवठा होत होता. मात्र, आता सरकारकडून लांबून ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजन राज्यात येण्यासाठी विलंब लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्राकडून देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून लक्ष हटवण्यासाठी देशमुखांच्या घरावर छापा टाकण्यात आल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
भाजपाचा राजकीय कट -
सीबीआयकडून देशमुखांच्या घरावर छापा टाकण्यात आला. हा सीबीआयचा गैरवापर करून राजकीय नेत्यांना बदनाम करण्याचा कट भाजपाने रचला आहे. यामुळे देशात आणि राज्यात मोगलाई लागल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे जयंत पाटील म्हणाले. नेहमी बोलणारे भाजपाचे राज्यातील नेते आता मात्र गप्प आहेत, यामुळे या सर्वांच्या मागे तेच आहेत का? याबद्दल आता शंका निर्माण झाली आहे, असा टोला फडणवीसांचे नाव न घेता पाटील यांनी लगावला.
हेही वाचा - अजून महादेवराव महाडिक सही सलामत; खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं