सांगली - वाळवा तालुक्यात ठिकठिकाणी सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शिराळा तालुक्यातील माळेवाडी येथे मुख्य रस्त्यावर बाभळीचे भलेमोठे झाड कोसळले. यामुळे, शिराळा कोकरुड मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
वाळवा तालुक्यातील भडकंबे, नागाव, कुरळप, या ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह गारांच्या पावसाने हजेरी लावली होती. तर चिकुर्डे येथे वीज पडून पिंजऱ्याच्या दोन गंज्या जळाल्या. त्वरित अग्निशमनच्या मदतीने आग विझवण्यात आली. पावसामुळे शेतकरी वर्ग शेतीची कामे सोडून घरी परतताना दिसत होते. या परिसरात दिवसभर उन्हाच्या तीव्रतेने ग्रामस्थ हैराण झाले होते. तर दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.
सलग तासभर पडत असलेल्या गारांच्या पावसाने ऊस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, भडकंबे येथील गारांच्या पावसामुळे डोगंराने जणू पांढरी शुभ्र चादर पांघरल्यासारखे दिसत होते. दिवसभर उष्णतेने अंगाची लाही लाही होत असताना ऐन उन्हाळ्यात पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.