सांगली - गेल्या दोन दिवसांपासून आटपाडी आणि जत तालुके वगळता सर्वत्र दमदार पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात 22 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
चोवीस तासांमध्ये शिराळा तालुक्यात 82 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने, चांदोली धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गुरुवारी 22 टीएमसी इतका पाणीसाठा असलेल्या धरणात, गेल्या चोवीस तासांमध्ये जवळपास अडीच टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे एकूण 24.70 टीएमसी इतका पाणीसाठा चांदोली धरणात निर्माण झाला आहे. चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता 34.5 टीएमसी इतकी असून, सद्यस्थितीत धरण 70 टक्के भरले आहे.
अजूनही पाऊस सुरुच असल्याने, धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होत आहे.