सांगली - जिल्ह्यातील संततधार पाऊसाला थोडाफार ब्रेक मिळाला आहे. मात्र शिराळा तालुक्यात पाऊसाचा जोर कायम आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ( Chandoli Dam area ) सहाव्या दिवशी अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे चांदोली धरण 65 टक्के भरले आहे. तर वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम असून वारणा नदी पत्राबाहेरच आहे. मात्र कृष्णाकाठेला आता थोडा दिलासा मिळाला आहे. कृष्णा नदीची वाढलेली पाणी पातळी आता हळूहळू कमी होऊ लागलेली आहे. सांगलीमध्ये एक फुटाने पाण्याची पातळी घटली आहे.
अशी आहे पाणी पातळी : गेल्या दहा दिवसांपासून सांगली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. चार ते पाच दिवसांत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी दहा फुटाने वाढली होती. तर वारणा नदी ही पात्र बाहेर पडली. मात्र आता जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 6.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर शिराळा तालुक्यात देखील पावसाचा जोर कमी होऊन 23 मिलिमीटर इतक्या पाऊसाची नोंद झाली आहे. मात्र चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टी ही कायम आहे. गेल्या 24 तासांमध्ये या ठिकाणी 87 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सहाव्या दिवशीही चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. 34.40 साठी एमसी इतक्या पाणीसाठा असणाऱ्या धरणात 22 टीएमसी इतका पाणी साठा झाल्याने 65 टक्के धरण भरले आहे. तर शिराळ तालुक्यात पडणाऱ्या पाऊसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम आहे. यामुळे वारणा नदी गेल्या चार दिवसांपासून पात्र बाहेर आहे. त्यामुळे वारणाकाठची शेती पाण्याखाली गेली आहे.
गावांना सतर्कतेचा इशारा : दुसऱ्या बाजूला कृष्णाकाठच्या नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला आहे. कारण पाच-सहा दिवसांपासून कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते. मात्र कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामधील पावसाचा जोर मंदावलेला आहे. त्यामुळे आता पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पूल या ठिकाणी गुरुवारी 20.5 फूटपर्यंत पोहोचली पाण्याची पातळी, आता कमी होऊन 19.5 फूट इतकी झाली आहे. अत्यंत संथ गतीने हे पाणी उतरत आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे. मात्र तरी देखील वारणा आणि कृष्णा नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा - India and Maharashtra Rain Update : देशभरासह महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; नद्यांना पूर, शाळांना सुट्टी