सांगली - हातगाडी आणि फास्टफूड विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी. यासाठी सांगलीतील हातगाडी विक्रेत्यांनी सोमवारी अनोख्या पद्धतीनचे आंदोलन केले. रस्त्याच्याकडेला हातात फलक घेऊन शांततेने हे आंदोलन करण्यात आले. जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमध्ये आता बरीचशी शिथिलता देण्यात आलेली आहे. हॉटेल व्यवसायिकांना पार्सलविक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हातगाडी, फास्टफूड विक्रेत्यांना अद्याप परवानगी मिळालेली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज हातगाडी विक्रेत्यांनी सांगलीत अनोखे आंदोलन केले.
रस्त्याच्या कडेला हातात फलक घेऊन आम्हालाही पार्सल विक्रीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी हातगाडी विक्रेते संघटनेने केली. अध्यक्ष सुरेश टेंगले यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. फिजिकल डिस्टन्स पाळत ही मागणी करण्यात आली. जयंत पाटील यांच्या सांगली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. सांगली-मिरज रोडवरील विश्रामबागपासून मार्केट यार्ड, तसेच शहरातील स्टेशन चौक, कॉलेज कॉर्नर याठिकाणी हातगाडी विक्रेत्यांनी डोक्यावर टोपी आणि हातात फलक घेऊन हे आंदोलन केले. यात ३०० हून अधिक हातगाडी विक्रते सहभागी झाले होते. सांगली शहरात सुमारे ५०० हून अधिक हातगाडी विक्रेते आहेत.