सांगली - मिरजेच्या कोरोना रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्याच्या सूचना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. दोनशे अधिक खाटांची निर्मिती करण्यात यावी, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत पाटील यांनी या सूचना दिल्या आहेत.
सांगली जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे. याचा सर्वाधिक भार पडत आहे, तो मिरजेच्या कोविड रुग्णालयावर. सध्या महापालिका क्षेत्रासह सांगली जिल्ह्यात कोरोनाची चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणीमधून लक्षणे नसतानासुद्धा कोरोना रुग्णांची संख्या समोर येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. त्यामुळे मिरजेचे कोरोना रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी अपुरा पडत आहे. प्रशासनाकडून इतर खासगी दवाखाने कोविड रुगण्यासाठीसाठी उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनासोबत तातडीची आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिक खाट उपलब्ध करण्याबाबत प्रशासनाकडून निदर्शनास आणून देण्यात आले. संपूर्ण आढावा घेतल्यानंतर, मंत्री पाटील यांनी कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता अतिदक्षता विभागांमध्ये खाटांची संख्या आवश्यक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे अतिदक्षता विभागात सर्व सुविधांसह 200 खाट वाढविण्यात यावी,असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.
त्याचबरोबर कोरोना रुग्णालयात लक्षणे नसणारे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून या रुग्णांमध्ये कोणतीही गुंतागुंतीची लक्षणे निर्माण होऊ नये, यासाठी त्यांची अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने देखभाल करण्यात यावी. तसेच त्या रुग्णांमध्ये लक्षणे उद्भवल्यास त्यांना तत्काळ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये संदर्भित करण्यात यावे व आवश्यक उपचार द्यावेत, अशा सूचनाही यावेळी दिल्या.