सांगली - सराफ दुकानात चोरी करून सोन्याचे दागिने घेऊन पश्चिम बंगालला पळून जाणाऱ्या गलाई कामगारास सांगली पोलिसांनी अटक केली आहे. तरुण दयाल असे या कामगाराचे नाव असून त्याच्याकडून 102 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.पुणे रेल्वे स्टेशनवरून त्याला अटक करण्यात आली आहे.
सोन्याचे दागिने घेऊन गलाई कामगाराचा पोबारा
सांगलीच्या सराफा कट्टा याठिकाणी प्रशांत जाना यांचे सोने-चांदी दागिने विक्रीचे सराफ दुकान आहे,त्यांच्याकडे पश्चिम बंगाल येथील तरुण दयाल हा युवक गलाई कामगार म्हणून काम करत होता. सराफ व्यासायिक जाना यांनी तरुणकडे 102 ग्रॅम सोन्याचे दागिने गलाई कामासाठी दिले होते. मात्र, सोमवारी रात्रीनंतर तरुण याचा मोबाईल बंद येऊ लागल्याने प्रशांत जाना याने तातडीने त्याचा शोध सुरू केला. मात्र, तो राहत असलेल्या ठिकाणीही आढळून आला नाही आणि पळून गेल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर जाना यांनी तातडीने सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपले सुमारे 4 लाख 50 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन तरुण दयाल पळून गेल्याची तक्रार दाखल केली.
पुणे रेल्वे स्टेशनवरून काही तासात जेरबंद
शहर पोलिसांच्या पथकाने तातडीने पळून गेलेल्या तरुण दयाल याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला. यावेळी तो गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेसने सांगलीच्या रेल्वे स्टेशनवरून पश्चिम बंगालकडे गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सांगली पोलिसांनी पुणे रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि पुणे रेल्वे पोलिसांनी मंगळवारी पहाटे रेल्वे स्टेशनवर निजामुद्दीन एक्सप्रेस पोहचल्यावर शोध घेतला असता, तरुण दयाल हा स्टेशनवर आढळून आला.
त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सांगली पोलिसांना याची माहिती दिली. पुणे मार्गावर असणाऱ्या शहर पोलिसांच्या पथकाने पुणे रेल्वे स्टेशनवरून तरुण याला अटक करत त्याच्याकडून 102 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांनी दिली आहे.