सांगली - प्रदूषण रोखण्यासाठी शहराच्या अमरधाम स्मशानभूमीत महापालिकेकडून गॅस शवदाहिनी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 7 ऑगस्ट) या पहिल्या गॅस दाहिनीचे लोकार्पण झाले आहे. पर्यावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी नागरिकांनी गॅस दाहिनीचा वापर करावा,असे आवाहन यावेळी पालिका प्रशासन आणि सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले आहे.
सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत आतापर्यंत लाकडांचा वापर करून शवाचे दहन केले जात होते. यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर केला जात होता. अनेकदा लाकडे भिजल्याने किंवा ओली असल्याने शव दहनासाठी मोठ्या अडचणी कर्मचाऱ्यांना येत होत्या. अनेकवेळा लाकडांची कमतरता भासल्याने अन्य मार्गाने शवाचे दहन करावे लागत होते. याचबरोबर लाकडांमुळे मृतदेह दहनासाठी पाच ते सहा तासाचा कालावधीही लागत होता. यातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषण होत होते. त्यामुळे या ठिकाणी गॅस शव दाहिनी उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती. यानुसार जिल्हा नियोजन समिती आणि महापालिकेच्या संयुक्त निधीतून या गॅस दाहिणीचे काम जलदगतीने पूर्ण करून आज गॅस दाहिणीचे लोकार्पण झाला आहे.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत, पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थिती हा लोकार्पण संपन्न झाला. गॅस शवदाहिनीमध्ये शव दहनासाठी सुलभ व्यवस्था आहे. यामुळे कसलेही प्रदूषण होत नाही आणि शव दहनासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागत असल्यामुळे वेळही वाचतो. याचबरोबर यासाठी पूर्णपणे गॅसचा वापर केला जात असल्याने लाकडे, रॉकेल यामुळे होणारे प्रदूषण पूर्णपणे रोखता येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांचा वेळही वाचणार आहे. त्यामुळे सांगलीकर जनतेने प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेच्या गॅस शव दाहिणीचा उपयोग करावा, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी यावेळी केले.
या शव दाहिणीचे लोकार्पण होताच एका जागरूक नागरिकाने आपल्या वडिलांच्या शवाचे दहन गॅस दाहिणीत करण्याचा निर्णय घेत नातेवाईक व महापालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वडिलांच्या शवावर गॅस दाहिणीत अंत्यसंस्कार करीत महापालिकेच्या गॅस दाहिणीचा उपक्रमाचे स्वागत केले आहे.