सांगली - लोकसभेच्या निवडणुकीत कोण निवडून येणार या चर्चेतून दोघा मित्रांनी चक्क १ लाखाची पैज लावली आहे. पैजेसाठी थेट नोटरीही करण्यात आली आहे. पैज लावण्याचा हा प्रकार मिरजेत घडला आहे. आता विजयी कोण होणार आणि १ लाख रुपये कोणाला मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
राजाराम कोरे भाजपचे कार्यकर्ते तर रणजित देसाई हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. दोघे मित्र आहेत. मिरजेच्या मार्केट कमिटीमध्ये एका कामानिमित्त ते भेटले. याठिकाणी असणाऱ्या मित्रमंडळींच्या सोबत सांगलीचा खासदार कोण होणार याबाबत चर्चा रंगली. यामध्ये कोरे यांनी भाजपचे संजय पाटील तर, देसाई यांनी स्वाभिमानीचे विशाल पाटील हेच निवडून येणार, असा दावा केला. दोघांनी सर्वांसमोर थेट १ लाखांची पैज जाहीर करुन टाकली. पैजेत कोणताही बदल होऊ नये, यासाठी कायदेशीर नोटरी करुन घेतली. याबरोबरच २४ मे २०१९ या तारखेचे एकमेकांच्या नावाचे चेकही देऊन टाकले आहेत.
सांगली मतदारसंघात नुकतेच मतदान झाले. विद्यमान भाजप खासदार संजय पाटील, काँग्रेस आघाडीचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात तिरंगी लढत आहे. या निवडणुकीत यंदा सव्वा टक्के अधिक मतदान झाले आहे. यामुळे निवडून कोण येणार? याबाबत अनेकजण तर्क-वितर्क लावत आहेत. राजकीय विश्लेषकही निकाला बाबत बुचकळात पडले आहेत. कोणी विशाल पाटील, संजय पाटील आणि गोपीचंद पडळकर निवडून येणार अशी वेगवेगळी मते मांडत आहेत.