सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांना मारहाण केल्या प्रकरणी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोतसह चौघांवर कासेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सोशल मीडियावरून टीका केल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप रविकिरण माने यांनी केला आहे.
स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण
वाळवा तालुक्यातील तांबवे येथील रविकिरण माने यांना खोत यांचे पुत्र सागर खोत यांच्यासह चौघांनी मारहाण केल्याचा आरोप स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी रविकिरण माने यांनी कासेगाव पोलीस ठाण्यामध्ये सागर खोत यांच्यासह चौघांविरोधात मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रवीकिरण माने हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे वाळवा तालुका अध्यक्ष आहेत.
चौघांवर गुन्हा दाखल
कासेगाव पोलीस ठाण्यामध्ये माने यांनी दिलेली तक्रारीप्रमाणे, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातुन शेतकरी आंदोलन व संघटनेचे काम करतो. या कारणाने रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते माझ्यावर चिडून होते आणि सोमवारी 6 सप्टेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास आमदार सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत व त्यांच्या तीन साथीदारांनी आपल्या तांबवे येथील घरात घुसून चाकू, तलवारी घेऊन, धकमी देत मारहाण केली. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकरी हितावरुन टिका केलेचा राग मनात धरून माझ्यावर हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप रविकिरण माने यांनी केला आहे.