सांगली - जत तालुक्यातील उमदी येथे समता आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा होऊन प्रकृती बिघडल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला आहे. एकाच वेळी 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं एकच धावपळ उडाली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना माडग्याळ येथील ग्रामीण प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. तर यातील काही मुलांची प्रकृती अधिक बिघडल्यानं त्यांना सांगली व मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
उमदी येथील असणाऱ्या समता आश्रम शाळेत सुमारे 200 हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. यामध्ये 5 वर्षांपासून 15 वर्षांपर्यंत मुला-मुलींचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे रात्री आश्रम शाळेकडून मुलांना जेवण देण्यात आलं. मात्र, रविवारी रात्री देण्यात आलेल्या जेवणानंतर मुलांना एकाच वेळी अचानक उलटी, मळमळ आणि जुलाब सुरू झाले.
50हून अधिक मुलांवर उपचार सुरू- एकाच वेळी सुमारे 170 मुलं आणि मुलींना त्रास होऊ लागल्यानं आश्रम शाळा प्रशासनाकडून उपलब्ध असणाऱ्या वाहनातून रात्रीच्या सुमारास माडग्याळ येथील ग्रामीण प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र, याठिकाणी आरोग्य यंत्रणा अपुरी असल्यानं काही विद्यार्थ्यांना जत येथील ग्रामीण प्राथमिक रुग्णालयात पाठवण्यात आलं. तर सुमारे 50 हून अधिक मुलांची प्रकृती अधिक बिघडल्यानं त्यांना मिरज आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलांना जेवण आणि बासुंदी देण्यात होती. त्यातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एकाच वेळी 170 मुलांना झालेल्या विषबाधा घटनेनं एकच खळबळ उडली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश- या प्रकरणाची जिल्हाधिकारी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा तपास करून 24 तासात अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी समाज कल्याण विभागाला देण्यात आल्या आहेत. आश्रमशाळांमधून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. भंडारामधील येरली येथे असलेल्या खासगी आदिवासी आश्रमशाळेतील ४१ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना 25 ऑगस्टला घडली होती. या विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
हेही वाचा-
- Food Poisson : भंडाऱ्यामधील आश्रमशाळेतील ४१ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. त्यामुळे मुलांची प्रकृती बिघडू लागली.