सांगली - शिवजयंती निमित्ताने एका अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्या सांगलीतील वालचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडून घोषित केलेले आर्थिक मदत अद्यापही मिळाली नाही. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आजही विद्यार्थ्यांचे कुटुंब शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
शिवजयंती निमित्ताने १९ फेब्रुवारी २०१८ ला सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला होता. ज्या मध्ये ६ विद्यार्थी ठार तर २० विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूरच्या पन्हाळागडावरून ज्योत आणताना नागावजवळ विद्यार्थ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. त्यानंतर या सर्वांना कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या भीषण अपघाताची माहिती मिळताच कोल्हापूरचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस करत मृत विद्यार्थांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपये मदत आणि जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा सर्व खर्च देण्याची घोषणा शासनाकडून केली होती. मात्र एक वर्ष उलटूनही विद्यार्थ्यांच्या कटुंबांना एक रुपयाची सुद्धा मदत मिळाली नाही. त्यामुळे शासनाकडून करण्यात आलेली घोषणा हवेतच विरली आहे. वालचंदच्या विद्यार्थ्यांनी ही मदत मिळावी म्हणून शासनाच्या पायऱ्या झिजवल्या, मात्र शासनाकडून वर्षाभरात काहीही मदत केले नाही.
या अपघातात सुशांत पाटील, प्रणित तिलोटकर, अरुण भोंडणे, केतन खोचे, सुमित कुलकर्णी आणि प्रतीक संकपाळ हे ६ विद्यार्थी मृत पावले होते. तर प्रणव देशमुख, आशिष शिंदे,हर्ष इंगळे, प्रणव मुळे आणि मुस्तकिम मुजावर हे ५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या कुटुंबियांना परस्थितीवर मात करत लाखो रुपये खर्च केले, तर यामधील मुस्तकीम मुजावर याच्यावर आजही उपचार सुरू आहेत. सरकारकडून करण्यात आलेली घोषणा जर अंमलात आली, असती तरी या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असता. मात्र अद्याप असे झाले नाही.
शासनाकडे पाठपुरावा करूनही मदत मिळत नसल्याने वालचंद अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना "एक लढा मावळयासाठी, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी" अशी भूमिका घेत विद्यार्थ्यांकडून अडीच लाखांचा निधी संकलन केला. शिवजयंतीदिवशी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना ही मदत देण्यात येणार आहे.
महसूलमंत्री यांच्या फसव्या घोषणेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने दिलेला शब्द पाळला नाही,तर रस्त्यावर उतरून बेमुद्दत उपोषणाचा इशारा सरकारला दिला आहे.त्यामुळे झोपी गेलेले सरकार, आता तरी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या मदतीच्या घोषणेचे पूर्तता करणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.