सांगली - जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील कृषी विभागाशी संलग्न असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात जाऊन बी-बियाणे पुरवण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या नावाची यादी तयार करण्याचे कृषी बचत गटांना तालुका कृषी विभागामार्फत आदेश देण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गातून बी बियाणे खते घेण्यासाठी कृषी दुकानासमोर गर्दी होऊ नये याकरता काळजी घेण्यात येत आहे.
वाळवा तालुका कृषी विभागामार्फत ज्या शेतकऱ्यांना बियाणे हवी आहेत, अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांच्या शेतात जाऊन बियाणे दिले जाणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून बियाणांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरण्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत होता. याचाच विचार करून महाराष्ट्र शासन वाळवा कृषी विभागामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी यांनी तालुक्यातील गावागात जाऊन शेतकऱ्यांकडे असणाऱ्या मागील वर्षाच्या सोयाबीन व इतर बियाणांची उगवण क्षमता चाचणी केली. ज्या बियाणांची उगवण क्षमता शंभर टक्के आहे अशा बियाणाची निवड करण्यात आली. त्यानुसार, तालुक्यातील 259 बचत गटांच्या मार्फत 1 हजार 316 शेतकऱ्यांना 108 टन बियाणे व 452 टन खत त्यांच्या बांधावर नेऊन दिले, असल्याचे तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
तर, कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे मिळणार आहे. तसेच, वेळेची बचतही होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. अजूनही काही शेतकऱ्यांना बियाणांची गरज असेल तर, आमच्या कृषी बचत गटाशी संपर्क साधून नाव नोंद करण्याचे आवाहन तालुका कृषी विभाग इस्लामपूर मार्फत करण्यात आले आहे. ही योजना संपूर्ण वाळवा तालुक्यात राबवण्यात आली आहे.