सांगली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. सांगलीमध्ये मोर्चा काढून शेतकरी संघटनेने नव्या कृषी कायद्याचे समर्थन करत, सुरू असलेले आंदोलन केवळ राजकारणासाठी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
केंद्राच्या कृषी कायद्याचे स्वागत
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्राच्या कृषी धोरणाला विरोध म्हणून देशभर आज विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. मात्र, सांगलीमध्ये शेतकरी संघटनेने या आंदोलनाच्या विरोधात प्रतिआंदोलन केले आहे. केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे शेतकर्यांच्या हिताचे आहेत, यामध्ये थोड्याफार त्रुटी आहेत, ते सरकार दूर करेल, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून झुंडशाहीने लुटणारे सर्व आज एकवटले आहेत आणि शेतकरी हिताच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत, असा आरोप करत शरद जोशी प्रणीत संघटनेने सांगली शहरातून मोर्चा काढला. तसेच नव्या कृषी कायद्याचे समर्थन करत स्वागत केले आहे.
शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. गणपतीपासून प्रमुख मार्गावरून सांगली अप्पर तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चा शेतकरी संघटनेने काढत केंद्राच्या कृषी कायद्याला पाठिंबा असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.