सांगली - रविवारी रात्री किसान आत्मनिर्भर यात्रेच्या इस्लामपूर येथे झालेल्या समारोप सभेत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्राचे नवे शेतकरी कायदे कसे हिताचे आहेत, हे सांगत राज्य सरकारवर टीका केली होती. त्याला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. आपल्या दारात ३०-४० लाख शेतकरी येवून बसले आहेत. त्यांना तुम्ही केलेले कायदे शेतकरी हिताचे कसे आहेत, हे समजून सांगा, असे त्यांनी म्हटले आहे. तुमच्याकडे उत्तर नसल्याने तुम्ही राज्याच्या गल्ली-बोळात फिरत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावला आहे. आष्टा येथील बापूसो शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
आघाडी सरकारच्या काळात शेतकरी समाधानी होता -
केंद्र सरकारला सहकार चळवळ व व्यवस्था मोडीत काढून खाजगी भांडवलदारांच्या हातात द्यायची आहे. मात्र, राज्यातील आघाडी सरकार सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असताना देशातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला. तसेच २००४ ते २०१४ या आघाडी सरकारच्या काळात देशातील शेतकरी समाधानी होता. स्व.पंडीत नेहरू, इंदिरा गांधी यांनी ज्या-ज्या सार्वजनिक व्यवस्था उभा केल्या होत्या, त्या मोडीत काढून देशातील जनतेला अडाणी व अंबानीच्या दारात उभे करण्याचा केंद्राचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा - ए आर रहमानच्या आईचे निधन, संगीतकार घडवण्यात होता मोलाचा वाटा