सांगली - वाळवा तालुका श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने इस्लामपूर येथे शहरी आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांचा उत्कृष्ठ पत्रकाराचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. ग्रामीण विभागातून दैनिक पुढारीचे जयशिंग रघुनाथ पाटील, दैनिक सकाळचे प्रसाद पाटील तर शहरी विभागातून दैनिक पुढारीचे सुनील माने यांना या वर्षाचा उत्कृष्ट पत्रकाराचा पुरस्कार देण्यात आला. उप विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे आणि तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
हेही वाचा - 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणारच नसेल तर, 'करून दाखवलं' होर्डिंग लावले कशाला'
पत्रकारांनी समाजामधील घडणाऱ्या चांगल्या गोष्टी फक्त लोकांपुढे मांडाव्यात. पत्रकार हा एका विशिष्ठ पद्धतीमध्ये आपले जीवन जगत असतो. अनेक अडचणींवर मात करत पत्रकार प्रामाणिकपणे आपले काम करत असल्याचे गौरव उद्गार इस्लामपूर उप विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी काढले. ते इस्लामपूर येथे वाळवा तालुका श्रमिक मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने ग्रामीण व शहरी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान बोलत होते.
हेही वाचा - सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाणप्रकरणी भाजप रस्त्यावर, सांगलीत निदर्शने
यावेळी कृष्णात पिंगळे म्हणाले की, कायदा, न्याय व सुव्यवस्था यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करत असतो. यामुळे एक समाज घडवण्याचे काम पत्रकार करत असतो. तर वाळवा तालुक्यातील पत्रकारांना काही शासकीय समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध असू, असे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे म्हणाले. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस वाळवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, उपाध्यक्ष सूर्यकांत शिंदे, सचिव धनंजय बामणे, विनोद मोहिते, अतुल मुळीक, ज्येष्ठ पत्रकार विश्वास धस, युवराज निकम, विनायक नाईकल आणि तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.